
जालना जिल्हाप्रतिनिधी सय्यद इलियास – जिल्हा परिषद प्रशाला, नेर (ता. जालना) येथील कु. वीरेंद्र बाळासाहेब कासारे या होतकरू विद्यार्थ्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत संपूर्ण नेर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.ही स्पर्धा १०० शिक्षक क्लब, जालना यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध शाळांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असताना वीरेंद्र कासारे याने प्रभावी मांडणी, विषयावरील सखोल आकलन आणि उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत द्वितीय क्रमांक पटकावला.या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विक्रम हनुमंतराव उफाड यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करत गौरव केला. तसेच मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर, केंद्रप्रमुख श्री. दिलीप राठोड सर, सर्व शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांनी वीरेंद्रचे मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी बोलताना मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर म्हणाले की, “वीरेंद्र कासारे हा आमच्या शाळेचा अभिमान असून, त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल. शाळेतून असेच गुणी विद्यार्थी पुढे यावेत, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत.”स्पर्धेत यश मिळाल्याने नेर गावात आणि शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र या विद्यार्थ्याचे कौतुक होत आहे.





