HomeBlogजालना जिल्ह्यातील रेशीम बाजार पेठ निर्माण व्हावे माझे स्वप्न होते रेशीम कोष...

जालना जिल्ह्यातील रेशीम बाजार पेठ निर्माण व्हावे माझे स्वप्न होते रेशीम कोष बाजारपेठ इमारत आमदार खोतकर यांची पाहणी.

जालना : जालना शहरातील बहुप्रतीक्षित रेशिम बाजारपेठ व प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी रविवारी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून तयारीचा सविस्तर आढावा घेतला. दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते रेशिम बाजारपेठ व प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड , जिल्हा रेशीम अधिकारी मोहीते यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक सुविधा, बांधकामाची स्थिती, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधा तसेच कार्यक्रमस्थळाची व्यवस्था याबाबत आ. खोतकर यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

यावेळी बोलताना आ. अर्जुनराव खोतकर म्हणाले की, “मी वस्त्रोद्योग राज्यमंत्री असताना राज्यातील पहिली रेशिम बाजारपेठ जालना येथे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रशासनाकडून जागा उपलब्ध करून घेतली आणि इमारत व बाजारपेठेच्या बांधकामासाठी ६ कोटी रुपये मंजूर करून घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली होती. बाजारपेठेची इमारत पूर्ण होऊन आता स्वतःच्या मालकीच्या जागेत रेशिम बाजारपेठ सुरू होत आहे, हे माझे स्वप्न पूर्ण होत असल्याचा मला आनंद आहे,” असे त्यांनी सांगितले. जालना येथे रेशिम बाजारपेठ सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना खोतकर म्हणाले की, यापूर्वी राज्यातील व जालना जिल्ह्यातील रेशिम उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी राज्यात रेशिम बाजार पेठ नसल्यामुळे कर्नाटक राज्यातील बंगळुरूजवळील रामनगर येथे जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणावर खर्च होत होते. ही अडचण लक्षात घेऊन जालना येथेच रेशिम बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवीन रेशिम बाजारपेठेच्या इमारतीमध्ये रेशिम खरेदी-विक्रीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाहेरून रेशिम विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी निवासाचीही व्यवस्था करण्यात आली असून, तब्बल आठ खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यासह परिसरातील रेशिम उत्पादक शेतकऱ्यांना या बाजारपेठेचा मोठा फायदा होणार आहे. आ. खोतकर यांनी उद्घाटन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. उद्घाटन सोहळा यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.यावेळी युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा रेशिम अधिकारी मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कापसे, तहसीलदार राजू निहाळ, उपजिल्हाप्रमुख संतोष मोहिते, माजी सभापती पांडुरंग डोंगरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.तसेच उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण आप्पा अवघड, माजी सभापती गोपीकिशन गोगडे, पंचायत समिती सदस्य जनार्दन चौधरी, सरपंच रवींद्र ढगे, बालाजी पवार, किशोर विटेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.जालना येथे रेशिम बाजारपेठ सुरू झाल्यामुळे रेशिम उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील रेशिम उद्योगाला नव्या उंचीवर नेण्यासाठी ही बाजारपेठ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जालना जिल्हा प्रतिनिधी – सय्यद इलियास, लोकशाही टाईम्स.

RELATED ARTICLES

Most Popular