
जालना जिल्हा प्रतिनिधी- सय्यद इलियास
बालस्नेही प्रभाग योजना’ प्रभावीपणे राबवणार
जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. संध्या संजय देठे यांनी बालस्नेही प्रभाग योजना संदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले की, प्रत्येक मुलाला सुरक्षित, स्वच्छ, आरोग्यदायी आणि विकासासाठी पोषक वातावरण मिळावे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

मनपा महापौर सौ. वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत आणि मनपा आयुक्त अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. प्रभागातील बालकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे.या योजनेअंतर्गत सुरक्षित खेळाची मैदाने, स्वच्छ व आरोग्यदायी परिसर, दर्जेदार शिक्षण, पोषण, आरोग्य सुविधा तसेच बालहक्कांबाबत जनजागृती अशा विविध बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

यावेळी सौ. संध्या संजय देठे यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, मुलांचा सर्वांगीण विकास ही केवळ शासन किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून पालक, शिक्षक आणि समाजानेही सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. बालस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे.प्रभागातील बालकांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत नागरिकांच्या सूचना प्रशासनाकडून विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे पालकांनी तसेच नागरिकांनी आपल्या सूचना आणि समस्या महानगरपालिका प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. बालस्नेही प्रभाग योजना ही जालना शहरातील मुलांच्या सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, प्रत्येक पालकाने या योजनेची माहिती जाणून घेऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. संध्या संजय देठे यांनी केले.





