
सेवली (जालना -प्रतिनिधी) सय्यद इलियास :लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सेवली येथील इयत्ता अकरावी (विज्ञान शाखा) मध्ये शिकणारी वैष्णवी साळुंके हिने छत्रपती संभाजीनगर विभागीय कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी सादर करून आठ जिल्ह्यांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे.वैष्णवीने कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्त यांच्या जोरावर हे यश मिळवले असून तिच्या या उल्लेखनीय यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या या कामगिरीमागे क्रीडा शिक्षक श्री. अहिलाजी धारे आणि श्री. विजय पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.सदर विद्यार्थिनीबद्दल लोकमान्य टिळक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा अध्यक्ष उकाजी जाधव यांनी अभिनंदन करताना म्हटले की,“वैष्णवी साळुंके हिचे यश हे सेवली गावासह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तिच्या पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”तसेच संस्थेच्या संचालिका सौ. जिजाबाई जाधव आणि संचालक श्री. मोहनराव जाधव यांनी वैष्णवीच्या या यशाचे कौतुक करून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. शामराव राठोड, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनीही वैष्णवीचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.वैष्णवीच्या या यशामुळे संपूर्ण सेवली परिसरात आणि विद्यालयात आनंद, अभिमान व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे.





