
बदनापूर, दि. 26 ऑक्टोबर: बदनापूर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आज महत्त्वपूर्ण राजकीय बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका,जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात दुसऱ्या फेरीत अत्यंत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.

या बैठकीस शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर, भाजप जिल्हाअध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंद (अण्णा) चव्हाण, माजी आमदार शिवाजीराव चौथे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलीया,शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचफुले मेघराज चौधरी, कैलास मदन, कोलते पाटील आदि तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत तिन्ही पक्षांच्या सुसंवाद व समन्वय साधत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीच्या माध्यमातून एकत्रित लढा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या चर्चेत मतदारसंघातील रणनीती, जागा वाटप,कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि स्थानिक नेतृत्वाचे योगदान या विषयांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.बैठकीनंतर बोलताना नेत्यांनी सांगितले की, “जनतेच्या हितासाठी आणि विकासाच्या गतीसाठी तिन्ही पक्ष एकत्र येऊन मजबूत युती उभारण्याच्या दिशेने ही चर्चा सकारात्मक टप्प्यात पोहोचली आहे.”






